Tuesday, October 27, 2009

इथली सकाळ सुंदर आहे

इथली सकाळ सुंदर आहे,
तापलेल्या मनातही,
सकाळचं ऊन ताजं आहे.
पानांचे रंग वेगवेगळे तजेलदार,
इथलं रानटी गवतही लच्छेदार,
पावसांत रंगीत छत्र्या कोट, वहाणारे पाट,
गुलाबी थंडीतल्या स्वेटरचा ठेवणीतला थाट.
उन्हाळा तप्त असला तरी,
संध्याकाळ सुखद आहे,
तिच्यासोबत वार्‍याची मंद झुळुक आहे.
इथली सकाळ सुंदर आहे.
इथली हवाच सुंदर आहे.
कुणाच्या घरी कुकरची शिट्टी,
मनांत वास दरवळत आहे.
कुणी म्हातारा फुलं वेचतोय,
केवळ टाईमपास की श्रद्धा?
की त्याला निसर्गाची आस आहे?
रस्त्यावर सगळे नियम धुडकावुन
मस्त बेफाम जाणारे ड्रायव्हर आहेत,
गाडीच्या मागे त्यांच्या
‘श्रद्धा-सबुरी’ची जाहीरात आहे.
उगाचच हॉर्न वाजवणारे,
बोनस म्हणुन शिवी हासडणारे,
त्रासलेल्या मराठी मनाचे प्रतिक आहेत.
सिग्नल तोडुन पुढे गेल्यावर
वळुन एखादीला पहाणारे रसिक आहेत.
आकर्षक ‘वस्तुं’ना आपला हक्क समजुन
डायरेक्ट धडकणारी क्षुद्र जमात आहे.
स्वच्छ रस्त्यावर विधीफुलं पसरवणारी
पाळलेली प्राणिजात आहे.
भर गर्दीच्या चौकामध्ये गुलाल वाहीलेला
अंधश्रद्धेचा वाढला भात आहे.
दर शनिवारी फेकलेले मिरची-लिंबु,
भुतं झाली स्वस्त, माणुस किती महाग आहे!
कुणाला तरी रस्ता ओलांडायला
मदत करणारा मदतीचा हात आहे.
आजोंबांचा हात धरुन नेणारी
पुढच्या पिढीची नात आहे . . .
मनापासुन सांगतो गड्यांनो,
इथली सकाळ सुंदर आहे.

No comments: