Wednesday, March 23, 2011

जीवनाचे मोल


जीवनाचे मोल



जीवनाचे मोल, मला कळून आले
जेंव्हा माझे प्रेत, अवघे जळून आले

बघ उमलून आली, पहाटेची लाली
बोचर्‍या थंडीत येती, रोमांच गाली
बघ शुक्राचे रंग, कसे उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

डोंगरामागून सुर्याचे, लाल बिंब आले
गवताचे हिरवे पाते, ओलेचिंब झाले
दरीतले धुके बघ, विरघळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

पाखरांचा थवा बघ, रानात चालला
किलबिलाट त्यांचा, कानात चालला
वासरु बघ गाईकडे, पळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ शाळेत पोरांचा, घोळका चालला
कोण आले कोण नाही, घोळ का चालला?
सरळ कोणी, कोणी मागे वळून चाले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ आमराईची, ती गर्द सावली
गाई गुरे उन्हाची, तेथे विसावली
वासरु हुंदडून पुन्हा, तेथे वळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

तिन्ही सांजेला पावसाचे, चार थेंब आले
स्वागताला त्यांच्या, बाहेर कोंब आले
नको झळा त्यांना, उन टळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

बघ सांजेला ते, किती रंग झाले
ढग मावळतीचे, इंद्रधनूत न्हाले
हळूच चांदण्याचे थवे, उजळून आले
जीवनाचे मोल, मला कळून आले

No comments: