Monday, December 27, 2010

आषाढातल्या मेघासम

आषाढातल्या मेघासम
भरुन आलो कितीदातरी
पण तू भिजशील म्हणून
बरसलोच नाही कधी

सप्तरंगी रंगात तुझ्या
रंगून गेलो कितीदातरी
पण तुझा रंग ओळखशील
म्हणून बोललोच नाही कधी

कितीदातरी बहरून आलो
प्रजाक्तासारखा .. तू भोवती असताना
पण कधी सांगितलं नाही तुला ..
सुगंधानं भोवळ येईल म्हणून

तुझ्याकडे येताना कितीदातरी
ओंजळ भरभरून फुलं आणली होती ..
पण ओंजळ लपवली मी ,
माझ्या फुलानीही तुझे हात पोळ्तील की काय म्हणून

कितीदातरी कविता माझी
शब्दांची शीडं भरुन हाकारली होती तुझ्याकडे
पण ओळींच्या मधलं
सांगितलं नाही तुला ..तू बावरशील म्हणून ..

कितीदातरी भेटलो आपण ,
बोलताना अडखळलो आपण
पण अडखळण्याचे अर्थ कधी
विचारले नाहीत तुला..कदाचित तुला ठेच लागेल म्हणून ..

सखे, तूच सांग आज मी
ओंजळ माझी कशी लपवू ?
ओंजळीतल्या फुलांचे
श्वास कसे मी रोखू ?

...निघालीसच सखे , तर
आज तशी तू जाऊ नको
माझी ओंजळ हाती घेतल्याशिवाय
निरोप माझा घेऊ नको

माझ्या ओंजळीतली चार फुलं
वेणीमध्ये खोचून जा
'तूझी होते रे ... काही क्षणतरी ..'
असं एकदाच लाजून सांगून

No comments: