Tuesday, December 14, 2010

" बाई ओळखलत मला ?

" बाई ओळखलत मला ?" ...
... " कोण रे बाबा तू ?"
" मी तुमचा विद्यार्थी शाळेतला "...
... " अरे कसा आहेस बाळा तू ?"

किती तरी वेळ मग बाई
चष्मा वर खाली करत राहिल्या
कपाळाची ताणून शीर
ओळखीन थोड पाहू लागल्या

" नजर कमजोर झाली रे आता "
" विसरायला होत खूप काही "
" तुम्ही असे अचानक उभे ठाकता "
" शरीर आता तशी साथ देत नाही "

कौतुकाने मग बाई बोलत होत्या
माझ्या यशाने खूप भारावत होत्या
सारे सारे कसे तृप्त भाव
मनगटी एक बळ देत होत्या

मी मात्र तेव्हा त्या दिवसांत रमलेला
आठवीत त्यांच्या त्या शिकवणीला
वाटे अजूनही पुन्हा लहान व्हावे
काळही कसा तो मंतरलेला

कापऱ्या हातांनी मग गोंजारत मला
डोळाभर प्रेमाने पाहिलं त्यांनी
सुखात रहा म्हणत शेवटी
रोजचा रस्ता धरला त्यांनी

पाठमोऱ्या जाताना त्यांचा
पदर डोळ्याकडे सहज गेला
दाटल्या अश्रूंना तेव्हा
आठवांसवे टिपत गेला

त्या नजरेआड होईस्तोवर
मी तिथे तसाच थांबलेला
हरवले कसे अन सुटले किती
क्षण हाही तसाच निसटलेला

No comments: