Wednesday, September 22, 2010

तुझ्यापासून दूर जावं म्हणतो,

तुझ्यापासून दूर जावं म्हणतो,


मनातलं सगळं मनातच जिरवावं म्हणतो ,

तुझ्याविषयी बरंच काही वाटतं पण,

आता विचार करणच बंद करावं म्हणतो

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



चंद्र,चांदण्या ,गुलाब, प्राजक्त

माझ्याच कवितांतले शब्द !

तुला पूर्ण ओळखल्यावर कळलं

ते सारे शब्द कवितांतच छान दिसतात .

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो!!



किती रात्री जागवल्या तुझ्या आठवणीत आणि

किती अश्रू ढाळले दुःख पचवण्यासाठी

पण तुला त्याचं काहीच नाही ....

हे माहित असूनही वेड्यासारख्या अपेक्षा ठेवल्या

पण,आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



आधी बऱ्याचदा असं ठरवलं होतं,

पण तुला विसरणं जमलंच नाही

अवघड आहे पण अशक्य नाही.

प्रयत्न सुरु आहेत म्हणूनच तर

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



पुढं कदाचित तुझ्यावर कविता सुचणार नाहीत

पुढची कविता 'विरक्त' या विषयावर करायचं म्हणतोय

तसं बघायला गेलं तर,

या वहीतल्या शेवटच्या आठ- दहा कविता तुझ्यावरच्याच!!

आता नवीन वहीत जरा वेगळा प्रवास

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



तरी पण मन आवरतच नाहीये.

आताच म्हणालं

करून टाक तिच्यावर एक कविता !

बघू सुचली तर ठीक नाही सुचली तर त्याहूनही ठीक !

तुझ्यापासून दूर जायचा मार्ग सोपाच होईल माझा

आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



छे !कविता खूपच मोठी होत चाललीये.

तुझ्यापासून दूर जातोय,

का तुझ्या जवळ येतोय,मलाच कळत नाहीये.



पण तशी आठवण येणारच ना की,

'xxx' नावाची व्यक्ती होती कोणीतरी

जिसे मै प्यार करता था...

तरीपण आता तुझ्यापासून दूर जावं म्हणतो !!



आता कवितेचा शेवट केलाच पाहिजे.

पानावर जरा खालती केमिकल्सचे

आणि मातीचे वगैरे डाग पडलेत.

काय करणार ? तुझी आठवण सगळीकडे

असो! तुझ्यावरची कविता मळण्यापूर्वीच

तुझ्यापासून दूर जातो .........

No comments: