Tuesday, October 6, 2009

Jeevan [Marathi Poem]

Jeevan [Marathi Poem]


मृत्यु निघाला रे आज
गीत स्वस्तुतीचे गात
देण्या माझ्याशी टक्कर
आहे कोण या जगात

असो राजा किंवा रंक
सारे माझ्यापुढे फ़िके
जन्मलेल्या प्रत्येकाला
वेढे मरणाचे धूके


धुक्यातून मरणाच्या
नसे सुटका कोणाची
गाथा मग का ती गावी
अशाश्वत जीवनाची

प्रेम शतदा करता
जीवनावर ज्या तुम्ही
जिवनाची त्या बैठक
क्षणातच उधळे मी

क्षणभंगूर जीवन
मृत्यू हेच एक सत्य
सामर्थ्यापुढे माझिया
बाकी सारे सारे मिथ्य

आहे यादीमध्ये आज
आजी एक नव्वदीची
खूप जगली आयुष्य
वाट आता परतीची

अंधुकशी दृष्टी तिची
त्वचा सुरकूतलेली
भार वाहून वयाचा
आजी आता थकलेली

आजी बसलेली खिन्न
तिची नजर शून्यात
मृत्यू ठाकला समोर
परी तिच्या न ध्यानात

मृत्यू झेपावला पुढे
गुंडाळण्या गळा फ़ास
दचकले जिवनही
आता शेवटचा श्वास

परी कोणाचे हे हास्य
कानी आले आकस्मात
नाद मधूर ऐकता
थांबे मृत्यूचाही हात

आले कसे खळाळत
दीड वर्षाचे तान्हुले
चालत नि लुटूलुटू
आजीकडे झेपावले

खदाखदा हास्य त्याचे
काय हासण्याचा डौल
हासण्यात त्या खळाळे
लक्ष जिवनांचे बळ

गेली खिन्नता पळून
आजी खळाळून हसे
हासण्यात तिच्या आता
बळ जिवनाचे दिसे

बिचकून मृत्यू मागे
दोन पाउले सरला
बळ हास्याचे कळता
अहंकारही जिरला

मृत्यू पाही यादी पुन्हा
आता तिचे नाव नाही
जिवनाच्या बळाने या
थांबविले काळालाही

लपे हर्षात जीवन
आणि हर्ष जिवनात
अशा जिवनाचे बळ
करी मृत्यूवर मात

आज इथे एकटाच
मृत्यू फ़िरला माघारी
जन्म हेच एक सत्य
हाच भाव दाटे उरी

No comments: