Sunday, July 5, 2009

ती केवळ सोबत होती


ती केवळ सोबत होती, सहवास म्हणालो नाही
गतकाळ तुझा माझा तो; इतिहास म्हणालो नाही

तू वागलीस तो सारा व्यवहार जगाचा होता
अपराध कधीही माझा केलास म्हणालो नाही

राखेत निखार्‍यासम मी, धग आहे अजून बाकी
तव हाती आहे जगणे, वार्‍यास म्हणालो नाही

ऐकतो इथे भरलेला आहे बाजार व्यथेचा
मी विकेन तरिही माझ्या दुःखास म्हणालो नाही

खांद्यावर या विश्वाच्या परिघास कसे पेलू मी ?
ज्या रेषेवरती जगलो तिज व्यास म्हणालो नाही

श्वासांच्या घेउन कुबड्या आहेत सचेतन सारे
मी जीवन ऐसे नुसत्या जगण्यास म्हणालो नाही

No comments: