अंधारात वाट शोधता येत नाही,
आणि कधीही परत येत नाही
त्याची कुणीच वाट बघत नाही....
तरीही मी अंधारात चाचपडायचं,
आणि वाट बघत रहायची..... तुझ्या येण्याची !
तू जाताना रणरणत्या उन्हाने
तुझे पाय भाजले असतील,
माळरानीचा उनाड वारा
तुझ्या केसांशी भांडला असेल....
आता मात्र तोच वारा
फुलांचा सुगंध गोळा करतोय,
आणि हिरव्यागार गवताचा स्पर्श
चुकलेल्या पावलालाही सुखावतोय... येशील ?
तेव्हा गावची नदी आटली होती,
आणि बहुतेक आपली मैत्री आणि गप्पाही...
आता काठांनाही पालवी फुटली आहे,
आणि शब्दांचा तर पूरच पूर....
बाकी काही नाही तरी
शब्दांना शब्दांची जोड द्यायला.... एकदा तरी येच !
No comments:
Post a Comment