मुक्त्तक
व्याकुळ माझ्या, नजरेला दे, नजर प्राशिण्यासाठी
तृषार्त माझ्या, अधराना दे, अधर प्राशिण्यासाठी
वसंतात तू, वसंतात मी, वसंत अवती भवती
मोहरलेल्या, वृक्षाला दे, बहर प्राशिण्यासाठी
नसेल जर का, तुला भरवसा, श्र्वासांची तू, झडती घे
रूप तुझेही, भरून उरले, डोळ्यांची तू, झडती घे
दुसरा तिसरा, विचार नाही, अविरत चिंतन, तुझेच गे
कधी अचानक, धाड टाकुनी, स्वप्नांची तू, झडती घे
तेल, वात अन्, ज्योत दिव्याची, तुझी आठवण, आणी मी
कसे तुला, समजावू वेडे, प्राणांची तू, झडती घे
क्षणाक्षणावर, तुझाच ताबा, तुझीच सत्ता, सभोवती
वाटल्यास मम, रोजनिशीच्या, पानांची तू, झडती घे
कळेल तुजला, कळेल मजला, भाकित अपुल्या, प्रीतीचे
तुझ्या नि माझ्या, तळहातांच्या, रेषांची तू, झडती घे
या ह्रदयाचा, अथांग सागर, नभी चंद्रमा, रूप तुझे
काठाची तू, झडती घे अन्, लाटांची तू, झडती घे
अजुन कोणता, हवा पुरावा सांग `इलाही' सांग तुला
तुझ्याच रंगामध्ये रंगलो, ग़ज़लांची तू, झडती घे
No comments:
Post a Comment