Thursday, August 14, 2008

प्राजक्ताचा सडा.....

कोपर्‍यावरचा प्राजक्त, तुला बघितलं की फुलतो...तुझ्याबद्दल जिव्हाळा, त्याच्याही मनात झुलतो...पण तू मात्र कधीच, त्याची दखल घेत नाहीस...आणि तो पण वेडा, तुझी वाट पाहणं सोडत नाही...त्याला विश्वास असतो, तू बघशील त्याच्याकडे प्रेमानं...तो ही मग शेजारच्या वडासारखा, तरारेल मग जोमानं...तो फुलतो, झडतो अन् पुन्हा नव्याने फुलत राहतो...तुझ्यावर मात्र मनापासून, मूकपणे प्रेम करत राहतो...आणि मग अचानक एके दिवशी, लग्न तुझं ठरतं...त्याला बातमी कळताच, त्याचंही मन भिरभिरतं...निकराचा प्रयत्न म्हणून, तो जोमानं फुलू पाहतो...सौंदर्याचा कळस गाठून, अस्तित्व विसरुन जातो...तरी तू मात्र येत नाहीस, दर्शन त्याला देत नाहीस...त्याच्या निःशब्द भावनांना, तू समजून घेत नाहीस...प्रेमभंगाच्या दुःखामध्ये, त्याचा अश्रूंशी लढा असतो...तुझ्या पाठवणीच्या पायघडीवर मात्र, त्याच प्राजक्ताचा सडा असतो...

No comments: