"कदाचित तुला माझी आठवण येईल !"
खिडकीत जेव्हा उभा तू असशील
ऐकू येईल पानांची सळसळ
काही शब्द ओळखीचे वाटतील
दबक्या आवाजातले, अधीर मिलनाचे
बघ त्यांना ऐकताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
चहाचा कप ओठी तू लावताना
अचानक तुझ्या लक्षात येईल
अजूनही तिच्या ओठांचे ठसे
कपावर उष्ण उसासे घेत आहेत
बघ त्यांना जाणवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
एकट्याने बाईक चालवताना
मंद झुळूक कानाशी खेळेल
स्पीड-ब्रेक जवळ ब्रेक मारताच
कुणी घट्ट बिलगल्याचे जाणवेल
बघ तो स्पर्श आठवताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
मुसळधार पाऊस असतानाही
पानांवरचे ओघळते थेंब पाहून
तिच्या निथळत्या केसांमधून
भिजलेले ते क्षण, तुला स्मरतील
बघ त्यांना स्मरताना, कदाचित तुला माझी आठवण येईल !
रात्री गोड झोपेत असताना
हलकेच कुणी स्पर्शून जाईल
पावलांना तुझ्या स्पर्श होता,
ती असल्याचा भास होईल
बघ तो भास होताच, कदाचित तुला माझी आठवण येईल !
No comments:
Post a Comment