आठवणींचे कपाट ...
काय कराव काही सुचत नव्हत
काम तर होत पण करायचं नव्हत
शांत बसायला कधी जमलच नाही
बोलायलाही तेव्हा जवळ कुणी नव्हत
घरभर उगीच मग तसाच फिरत राहिलो
अडगळीच्या खोलीत जरा हळूच शिरलो
समोरच दिसलं ते छोट जून कपाट
उघडावं की जाव हाच विचार करत राहिलो
न राहवून शेवटी मी उघडलंच ते
करकरल थोड ... थोड डगमगल ते
धुळीचा एक लोट मग हवेत उठला
जळमट काढून नीट निरखल ते
काय काय नव्हत त्या एवढ्याश्या कपाटात
अख्ख बालपण माझ ठासून भरलेलं त्यात
एक एक कप्पा एक किस्सा होता सांगत
साठवायलाही आज पण जागा नव्हती घरात
मी जिंकलेल्या त्या पिशवीभर गोट्या
भातुकलीच्या खेळातल्या पितळेच्या वाट्या
रंगबिरंगी जमवलेल्या आता फुटलेल्या काचा
थोडे शंख-शिंपले, थोड्या लगोरीच्या चपऱ्या
कोपऱ्यात जुन्या पुस्तकांची थोडी थप्पी होती
रंगवलेल्या चित्रांची एक वहीही होती
लाकडी डब्यात एका तांब्याची नाणी होती
एक हत्ती, एक घोडा, एक बैलगाडीही होती
सारे किती क्षुल्लक किती स्वस्त होते
चार दोन आण्यांच्या किमतीलाही नव्हते
लाखमोलाचे क्षण परी त्यात होते गुंतलेले
कसे आज सांगू किती निसटले होते
दिवसभर तसाच मी तिथेच रमलेला
स्पर्श होता साऱ्याचा लहानगा झालेला
हाक मारली कुणी तेव्हा भानावर आलेला
आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...
आठवणींचे कपाट मनी बंद करून निघालेला ...
No comments:
Post a Comment