चिघळल्या जखमा मनी, स्पर्शू नको,फुंकून जा
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....
भावना-संवेदनांचा बांध कोसळला असा,
कोरड्या डोळ्यात माझ्या खार-पाण्याचा ठसा.....
सांत्वनाची चार वाक्ये, खोटीच तू बोलून जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....
निखार्यावर चालतांना भाजले हे पाय रे,
पाऊसही तेज़ाब झाला, झेलता मी हाय रे !!
जाळ उरी चेतला, विझवू नको, पाहून जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....
कोमेजल्या मनी अजुनी, गंध आहे मोगरा,
करपल्या श्वासात थोडा उरला रे केवडा...
जपले जे तुजसाठी, तुझे तुच घेऊन जा...
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....
सरणाची राख झाली, प्रेत नाही संपले,
अंताच्या क्षणात होते, तुजमध्ये गुंतले....
अखेरची आग आता, शेवटी लाऊन जा....
आर्जवी ही हाक माझी, एकदा ऐकून जा....
No comments:
Post a Comment