माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू...
माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू
तुझाच होईल आवाज, मी शांत असेन
असह्य होऊन कबर खोदून पाहशील
तेव्हां त्या थडग्यात मीच नसेन
कारण..
मी सूर्याचा सहस्त्र किरण
मी उन्मुक्त बेधुंद पवन
मी जरासा लाजरा सावन
शांत शांत पुलकित पावन
मी भारलेला सुशांत मेघ
तू हारलेली निवांत रेघ
मी रातराणीचा गंधित वारा
माळतेस अजूनी तू माझाच गजरा
तू कडाडती रौद्र दामिनी
मी गात जातो चिमणगाणी
तू करीत जा चांदणे गोळा
मी नभीचा चंद्र वाटोळा
कशास मोजतेस अजूनी नाणी
मी पक्षांची किलबिल गाणी
कशास आताही तो जुनाच तोरा
मी पहाटल्या स्वप्नांचा तारा
गळून पडतील बाह्याचे इमले
वेचत जाशील मोत्याचे शिंपले
नको उघडू गं, निखळतील मोती
दोन्ही डोळ्यातून कबरीभवती
म्हणूनच प्रिये, सांगतो तुजला
माझ्या थडग्याजवळ ढाळू नको आसू
तुझाच होईल आवाज, मी शांत असेन
असह्य होऊन कबर खोदून पाहशील
तेव्हां त्या थडग्यात मीच नसेन
जे घडेल ते सहन करायचे असतं..
13 years ago
No comments:
Post a Comment