Friday, February 5, 2010

..मज अजुनही जगायचे

..मज अजुनही जगायचे


उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे
पेटले बेभान रान
   मज भानावर यायचे


लाजली कळी कळी
   खळी गालावर उमलली
उमलत्या खळीत जळून
   पाकळी बहरली
बहरत्या फुलात मिटुन..... 
   ......मज पाखरु बनायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे


मन सैर भैर पाखरु
   श्वासावरी तरंगले
पेटला श्वासात गंध
   गंधात भास रंगले
रंगात अंग भिजवुनी...
   .....मज तरंगात गायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे

उन्मत्त रात्र रेशमी
   विखरुन पाश न्हायली
पाशात दंश लपवुनी
   दरवळली सायली
मोहात मात असुनही....
   ....मज पराभूत व्हायचे
उधळू नको मोहरंग
   मज अजुनही जगायचे... !

No comments: