Monday, July 6, 2009

बरं झालं



या जमिनीत

एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो . . .

चारदोन पावसाळे बरसून गेले

की रानातलं झाड बनून

परत एकदा बाहेर येईन . . .

म्हणजे मग माझ्या झाडावरच्या

पानापानांतून, देठादेठावर,

फांदीफांदीलाच मीच असेन . . .

येणारे जाणारे क्षण्भर थबकून,

सुस्कारत म्हणतील -

" बरं झालं हे झाड आलं !

अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

आणि पानापानांतून माझे चेहरे

त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील . . .

माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर

माझं हसू आणि झुळूकश्वास

माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन . . .

त्यांच्या घामाचे ओघळ

माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -

" बरं झालं हे झाड आलं !

अगदीच काही नसण्यापेक्षा . . . !"

माझ्या अंगाखांद्यांवर

आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं

आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील . . .

त्यांची वसंतांची गाणी

उडत माझ्या कानी येतील . . .

ती म्हणतील -

" बरं झालं हे झाड आलं . . .

नाहीतर सगळा रखरखाटच होता !

याच जागी आपल्या मागे लागलेला

तो वेडा कवी कुठे गेला ?"

मी पानं सळ्सळ्वत कुजबुजीन -

" बरं झालं मी झाड झालो . . .

वेडा कवी होण्यापेक्षा

आणखी काही वर्षांनी

मी सापडतच नसल्याचा शोध

कदाचित, कुणाला तरी लगेलही . . .

एखाद्या बेवारस, कुठल्याही

पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे

ते माझ्या नावाने अश्रु ढळतील . . .

माझी वेडी गाणी आठवत

कोणी दोन थेंब अधिक टाकेल . . .

आणी . . .

माझ्या चितेच्या लाकडांसाठी

माझ्याचभोवती गोळा होत

घाव टाकता टाकता ते म्हणतील -

" बरं झालं हे झाड इथे आलं

अगदीच लांब जाण्यापेक्षा . . ."

माझ्यावरती ' कोणी मी '

जळून राख बनताना

धूर सोडत म्हणेन -

" बरं झालं मी झाड झालो

अगदीच कुजून मरण्यापेक्षा . . . . . . . . . . . . "

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे


No comments: